Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 08:28 AM2020-03-27T08:28:12+5:302020-03-27T08:31:31+5:30
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघात खासदार निधीतून २ कोटी ६६ लाखांचा निधी घोषित केला आहे.
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे भारतावर संकट उभं राहिलं आहे. देशात कोरोनाचे ७०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचं घोषित केलं. १४ एप्रिलपर्यंत लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, हे २१ दिवस देशासाठी महत्त्वाचे आहेत अशी कळकळीची विनंती पंतप्रधानांनी जनतेला केली आहे.
कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केले. नितीन गडकरी यांनी एक महिन्याचं वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीत देणार आहेत. गडकरी यांनी देशातील लोकांना संकटाच्या काळात पुढे येऊन योगदान द्यावं असं आवाहनही केलं आहे.
नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी कोविड १९ च्या संकटाचा सामना करण्यासाठी माझं एक महिन्याचं वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीत देत आहे. लोकांनीही या संकटाचा सामना करण्यासाठी पुढे येऊन आपापल्या परिने आर्थिक मदत करावी. आतापर्यंत देशात कोरोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही एक कोटींची मदत केली आहे. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी जनतेला सुविधा देण्यासाठी खासदार निधीतून १ कोटींची मदत देत आहे. या निधीचा उपयोग जिल्हा प्रशासनाकडून योग्य प्रकारे केला जावा असं त्यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघात खासदार निधीतून २ कोटी ६६ लाखांचा निधी घोषित केला आहे. वायनाडमध्ये आवश्यक आरोग्यविषयक उपकरणांची खरेदी करण्यासाठी या निधीचा वापर व्हावा असं त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
महाराष्ट्रतही शिवसेना-राष्ट्रवादी सरसावली
एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहायता निधी'साठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'प्रधानमंत्री सहायता निधी'साठी देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आहे. तशाप्रकारे आदेश पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना आणि खासदारांना दिले आहेत.
राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी व संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'प्रधानमंत्री सहाय्यता निधी'ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री. @Jayant_R_Patil यांचेकडे जमा करावेत.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 26, 2020
तर शिवसेना खासदार, आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहेत. कोरोना वायरस विरुध्दच्या लढाईत हा खारीचा वाटा आहे. मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जींकू.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2020