नवी दिल्ली : केंद्र सरकारचा आरोग्य विभाग जरी कोरोना तिसऱ्या टप्प्यात गेलेला नसल्याचे सांगत असले तरीही वाढत्या रुग्णांची आकडेवारी देशासमोरील मोठ्या संकटाची चाहून देत आहे. एक दोन असे करत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आज अडीज हजारावर पोहोचली आहे. आज दिवसभरात देशात तब्बल 453 रुग्ण सापडले आहेत. तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून हा आकडा ४१६ आहे. तर त्यानंतर तामिळनाडू ३०९, दिल्ली २९३, केरळ २८६, तेलंगाना १५४, आंध्रप्रदेश १४३ मध्ये सापडले आहेत. तर सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेले असले तरीही केरळ, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही मृत्यूंची संख्या जास्त आहे.
आज देशभरात ४५३ कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने हा आकडा २५१२वर पोहोचला आहे. तर यापैकी १८६ रुग्ण बरे झाले आहेत. ७० जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सध्य़ा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २२५६ झाली आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन मरकजला गेलेल्या तबलीगी जमातच्या नागरिकांपैकी ४०० लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर यापैकी १९ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या दिल्लीत आज १२९ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.