नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. देशामध्ये कोरोनाने थैमान घातले असताना यावरून देशात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी खूप मेहनत घेत आहेत. संकटसमयी संयमाने काम करत आहे, अशा आशयाचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. यावरून आता पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात येत आहे. (coronavirus prashant kishor criticised pm narendra modi over article in the guardian daily)
‘द डेली गार्डियन’ या इंग्रजी वेबसाइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची, कामाची दखल घेणारा एक लेख छापून आला आहे. या लेखाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बहुतांश भाजप नेत्यांना हा लेख आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”
हे लज्जास्पद आहे
एक शोकाकुल देश म्हणून आपण आताच्या घडीला कोरोना परिस्थितीचा सामना करत आहोत. आपल्या आजूबाजूस घडत असलेल्या शोकांतिकांना आपण सामोरे जात असतानाच खोटी माहिती आणि प्रचार हा सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली पसरवला जातोय, हे लज्जास्पद आहे, अशी टीका करत सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला सरकारच्या आंधळ्या प्रचारकांपैकी एक होण्याची गरज नाही, असे प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
पंतप्रधान मोदी काम करत असल्याचा प्रचार भाजपा नेत्याकंडून केला जात असतानाच शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सर्व नेत्यांनी केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आपल्याला प्रश्न विचारत असले म्हणून काय झाले? आम्ही आमचा प्रचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वेबसाईटसारखी दिसणारी साईट निर्माण करु, असा टोला लगावत यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
निवडणूक ड्युटीवर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १ कोटींची भरपाई मिळायला हवी: हायकोर्ट
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मेहनत घेत आहेत, विरोधी पक्षांच्या जाळ्यात अडकू नका. देशाला असे पंतप्रधान लाभलेत जे संकटसमयी शांतपणे आपले काम करत आहेत आणि कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देण्यापासून ते दूर आहेत. कारण या सर्व गोष्टींसाठी ही वेळ योग्य नाही. ते आपले लक्ष आणि ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी वापरत आहेत तसेच दुप्पटीने काम करत आहेत, असे नमूद करत इतरांप्रमाणेच त्यांनीदेखील 'क्राय बेबी' बनून प्रश्नांचीच चर्चा केली तर उत्तरे कोण शोधणार, अशी विचारणा या लेखातून करण्यात आली आहे.