नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय दिल्ली सरकारच्या कार्यालयांमध्ये बायोमॅट्रिक अटेंडेंसला स्थगिती देण्यात आली आहे.
मनीष सिसोदिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले, "31 मार्चपर्यंत प्राथमिक शाळा बंद राहतील. यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहतील. दिल्ली सरकारचा हा निर्णय उद्या म्हणजेच शुक्रवार, 6 मार्चपासून लागू होणार आहे. यामध्ये सरकारी, खाजगी, ऐडेड, एनडीएमसी या सर्व शाळांचा समावेश आहे. तसेच, आम्ही सर्व शाळांमध्ये कोरोना व्हायरससंबंधी सूचना दिल्या आहेत."
दरम्यान, चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना व्हायरससंबंधी सर्व प्रकरणावर लक्ष ठेवण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. देशात आतापर्यंत 29 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. विदेशातून आलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत सांगितले.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, "देशात कोरोना व्हायरसचे 29 लोकांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. केरळमधील तीन रुग्ण ठीक झाले आहेत. दिल्लीत एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला, तो इटलीहून भारतात आला होता. पंतप्रधान कार्यालय यावर लक्ष ठेवून आहे. 4 मार्चपर्यंत 6,11,176 प्रवाशांची वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी झाली आहे."
याचबरोबर, देशात 18 जानेवारीपासून स्क्रीनिंग करण्यात येत आहे. चीन, जपान, हाँगकाँग, नेपाळ, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग आधीपासूनच करण्यात येत होती. आता विदेशातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात येत आहे. N95 मास्क आणि इतर उपकरणांच्या एक्सपोर्टवर नियंत्रण आणले आहे, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
आणखी बातम्या..
संसदेत गोंधळ, काँग्रेसच्या सात खासदारांवर निलंबनाची कारवाई
Delhi Violence : पीडित कुटुंबांना भाजप देणार प्रत्येकी पाच हजार रुपये
Coronavirusची धास्ती, Cognizantकडून ऑफिस बंद, कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना
Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना 20 मार्चला फासावर लटकवणार, नव्याने डेथ वॉरंट जारी