करमाडः औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. जालना येथील स्टील कंपनीचे १९ कामगार भुसावळला जाण्यासाठी रेल्वे रुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १६ जण ठार, तर २ कामगार जखमी झाले. सर्वांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली असून, रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. आवश्यक मदत केली जाईल, असंही आश्वासन मोदींनी दिलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एका कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. धर्मेंद्र सिंह(२०), ब्रिजेंद्र सिंह(२०), निर्बेश सिंह (२०), धन सिंह (२५), प्रदीप सिंह, राज भवन, शिव दयाल, नेमसहाय सिंह, मुनिम सिंह, बुधराज सिंह, अचेलाल, रविंद्र सिंह या मजुरांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.