चीनच्या वुहानमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या कोरोनानं जगभरात पाय पसरले आहेत. जगभरात 156,396 कोरोना व्हायरसनं संक्रमित झालेले रुग्ण आढळून आले असून, त्यात चीनमध्ये जवळपास 80955 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. तसेच भारतात देखील कोरोनामुळे आतापर्यत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 96वरून 108वर पोहोचली आहे. याच पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'सार्क' देशातील नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी कोरोनाशी लढू आणि जिंकू असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
नरेंद्र मोदी यांनी यावेळी कोविड-१९ साठी एका एमर्जन्सी फंडचा प्रस्ताव सार्क देशांसमोर मांडला. या प्रस्तावानंतर एमर्जन्सी फंडासाठी भारताकडून 1 कोटी डॉलर देण्याची घोषणाही नरेंद्र मोदींनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये केली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ ला महारोग म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे आपल्यालाही जास्त सतर्क राहण्याची गरज असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सर्वजण तयार राहा, घाबरुन जाऊ नका असं आवाहन करत हाच आमचा मार्गदर्शक मंत्र असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी कोरोनावर चर्चाचे आयोजन केल्याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे. तसेच चीनच्या वुहानमधून बांग्लादेशच्या 23 विद्यार्त्थांना बाहेर काढण्यासाठी भारताने मदत केल्याबद्दल शेख हसीना यांनी नरेंद्र मोदींना धन्यवाद देखील म्हटले आहे.
138 देश कोरोनाच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने कोरोनाविरुद्ध पावलं उचलण्यापासून मागे राहू शकत नाही असं व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या पाकिस्तानच्या प्रतिनिधी जफर मिर्झा यांनी सांगितले. तसेच पाकिस्तान कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यास यशस्वी झाल्याचे देखील जफर मिर्झा यांन म्हटले आहे.