CoronaVirus : मोदींच्या 'थाळीनाद'नंतर आता घुमणार 'जयघोष'; २० एप्रिलला 'हर हर महादेव'च्या घोषणा देण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 02:23 PM2020-04-18T14:23:12+5:302020-04-18T14:29:00+5:30
CoronaVirus :पंजाब काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'थाळीनाद' कार्यक्रमासारखे येत्या २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता 'जयघोष दिवस' साजरा करण्याचे जाहीर केले आहे.
चंदीगड - देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासह पोलीस आणि सरकारी कर्मचारी एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत. यांच्यासोबतची एकता आणि पंजाब सरकारच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी पंजाबकाँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'थाळीनाद' कार्यक्रमासारखे येत्या २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता 'जयघोष दिवस' साजरा करण्याचे जाहीर केले आहे.
पंजाब काँग्रेसने लोकांना २० एप्रिलला घरातच राहून 'जो बोले सो निहाल' आणि 'हर हर महादेव' अशा घोषणा देण्याचे आवाहन केले आहे. पंजाब काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी पत्रात म्हटले आहे की, "आम्ही पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी बऱ्यापैकी यशस्वी होत आहोत."
याचबरोबर, सुनील जाखड यांनी लिहिले आहे की, "मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहाय्यता निधी देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे आर्थिक संकट दूर होईल. यासाठी आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की, मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची मागणी केंद्र सरकारसमोर ठामपणे मांडण्यासाठी आणि पोलीस कर्मचारी, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत एकजुटता दाखवत २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता घरात राहून 'जो बोले सो निहाल' आणि हर हर महादेव अशा घोषणा द्याव्यात."
पंजाबचे मुख्यंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी याआधीही केंद्र सरकारकडे सहाय्यता निधीची मागणी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस जनता कर्फ्यू लागू करून संध्याकाळी कोरोनावर मात करण्याऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आयाबाई, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, पोलीस आदींसह अत्यावश्यक सेवेतील कामगार,कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या तसेच थाळीनाद करण्याचे आवाहन केले होते.
देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. देशात आतापर्यंत १४३७८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९९१ नवे रुग्ण आढळले. तर ४३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करून १९९२ रुग्ण बरे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.