नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. अनेक राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. असं असतानाच आता राजधानी दिल्लीनंतरपंजाबमध्येही मास्क सक्ती करण्यात आली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांच्या सरकारने कोरोना नियमावली जारी केली आहे, त्यामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.
पंजाब सरकारनेच्या गृह विभागाकडून सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालय तसेच इनडोअर आणि आउटडोअर बैठक, मॉल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पंजाब सरकारकडून जारी करण्यात आलेल्या कोरोना गाइडलाईनमध्ये सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्याबाबातही सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, सर्व नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस अथवा बूस्टर डोस घेण्याबाबातही आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत, त्यांनी तात्काळ चाचणी करावी, तसेच विलगीकरणात राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी धुंकण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत पंजाबमध्ये 200 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्येही मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात येईल, असाही निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.
दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारने खबरदारीच्या दृष्टीने आता पावलं उचलली आहे. पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू केली असून सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्तीचे पालन न कऱणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच खासगी चारचाकी गाडीने जर प्रवास करत असाल तर मास्क न घातल्यास दंड आकारला जाणार नाही असं म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. नियमावलीचं पालन करा असं प्रशासनाच्या वतीने सांगतण्यात येत आहे.