चंदिगड - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण देशाच्या अनेक राज्यांत पसरले आहे. यामध्ये सहभागी झालेल्यांपैकी काही जणांचे मृत्यू झाले आहेत. मरकजमध्ये सहभागी झालेले तबलिगी अनेक राज्यांत आल्याने प्रशासनाची झोप उडाली. यातील काही जणांपर्यंत पोहोचण्यात प्रशासनाला यश आलं. मात्र अजूनही काहींचा शोध लागलेला नाही. काही राज्यांनी तबलिगींना स्वतःहून समोर येण्याचं आवाहन केलं आहे. पण तरीही काही जण अजूनही समोर येत नसल्याने पंजाब सरकारने तबलिगींना इशारा दिला आहे.
24 तासांच्या आतमध्ये स्वतःहून समोर या, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील असं पंजाब सरकारने तबलिगींना सांगितलं आहे. पंजाब सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यात लपून बसलेल्या तबलिगींनी 24 तासांच्या आत जवळच्या पोलीस ठाण्यात हजर व्हावं. जे हे करणार नाहीत त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होतील असं पत्रक जारी केलं आहे. दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकजमधून जे जाऊन आले आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वेगानं वाढला आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमधील मरकजमध्ये सहभागी झालेले 1400 तबलिगी राज्यात आल्यानं प्रशासनाची झोप उडाली. मात्र यातील साडे तेराशे जणांपर्यंत पोहोचण्यात प्रशासनाला यश आलं. पण अजूनही 50 जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही. या 50 जणांनी लवकरात लवकर स्वत:हून पुढे यावं आणि कोरोना चाचणी करून घ्याव्या. अन्यथा आम्ही योग्य कारवाई करू, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
'दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेले 1400 जण राज्यात आले. यातील साडे तेराशे तबलिगींशी संपर्क साधण्यात यश आलंय. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत. मात्र अजूनही 50 जण नॉट रिचेबल आहेत. त्यांनी फोन बंद केले आहेत. या व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावं. आम्ही त्यांच्या आवश्यक चाचण्या करू. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास आमचं प्राधान्य आहे,' असं देशमुख यांनी सांगितलं. लपून बसलेल्या 50 तबलिगींनी शासनाला सहकार्य करावं. अन्यथा आम्ही त्यांना शोधून काढू आणि कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...म्हणून 'या' डॉक्टरने कारमध्ये थाटलंय घर, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक
Coronavirus : 'अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येईल, लोकांचे जीव गेले तर ते परत कसे आणणार?'
Coronavirus : 'घरचे आजारी पडले तर...', कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले
Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी
Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा