चंदिगढ - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनला आता महिना होत आला आहे. मात्र तरीही देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी अजून काही काळासाठी वाढवण्याचे संकेत काही राज्यांनी दिले . दरम्यान, पंजाब सरकारने लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेताना राज्यातील लॉकडाऊन अजून दोन आठवड्यांनी वाढवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी देशवासीयांनी संबोधित करताना देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. हा कालावधी चार दिवसांनी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने खबरदारी म्हणून राज्यातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. या काळात सकाळी 7 ते 11 या वेळेत नागरिकांना संचारबंदीतून सुट दिली जाईल. पंजाबमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला नाही. राज्यात कोरोनाचे 322 रुग्ण सापडले असून, कोरोनामुळे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा विचार केल्यास आतापर्यंत देशात 31 हजार 332 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून,आतापर्यंत 1007 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात हजारांहून अधिक लोकांनी कोरोनाला मात दिली आहे.