नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोरोना व्हायरस रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र तरी देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. हा व्हायरस एवढा खतरनाक आहे की, कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलं तरी त्याची लागण होते. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार राजधानी दिल्लीतील सहा डॉक्टरांना आणि चार नर्सला कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाईन करण्यात आले.
दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील सहा डॉक्टर आणि चार नर्सला कोरोना व्हायरस बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे.
देशातील कोरोना बाधितांचा आकडा रविवारी एक हजारच्या पुढे गेला आहे. तर आतापर्यंत २७ रुग्ण या व्हायरसमुळे दगावले आहेत. तर रुग्णांची संख्या १०२४ झाली आहे. त्यानंतर अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. दिल्लीत कोरोना बधितांची संख्या २३ ने वाढली असून दिल्लीतील रुग्णांची संख्या ७२ वर पोहोचली आहे. त्याचवेळी दिल्लीतून कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे दिल्लीत कोरोनाचा धोका अजुनच वाढत आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. रविवारी देशात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा १ हजाराच्या वर गेला आहे. तर एकाच दिवसात १३० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशात १ हजार १२२ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर केंद्रीय मंत्रालयाने अद्याप १ हजार २४ रुग्ण आणि २७ मृत्यू अशी आकडेवारी सांगितली आहे.