तेलंगणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, तरीही नागरिक एकत्र येत असून लॉकडाऊऊनचं उल्लंघन करत आहेत. तेलंगणामध्ये कोरोनामुळे सोमवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. हे सर्वच्या सर्व कोरोना संक्रमित होते. गेल्या 13 ते 15 मार्चदरम्यान दिल्लीजवळील निजामुद्दीन येथे तब्लिगी मरकजमध्ये ते सहभागी झाले होते. त्यामुळे, तेलंगणात अनेकांना विविध हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, क्वारंटाईन केल्यानंतरही नमाज अदा करण्यासाठी मुस्लीम लोकं एकत्र आल्याचे हैदराबाद येथील रुग्णालयातील फोटोंमुळे समोर आलं आहे.
निजामुद्दीनमधील मरकजमधून तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या लोकांची तपासणी करण्याचे काम सुरुच आहे. तेलंगणामध्ये १९४ लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर तामिळनाडूमध्ये ९८१ लोकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय दिल्लीत मरकजशी संबंधित आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. याशिवाय 228 संशयित रुग्णांनाही दिल्लीतील दोन रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे.
कोरोनामुळे संक्रमित असलेल्या नागरिकांवर हैदराबाद येथील गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याच हॉस्पिटलमध्ये संभाव्य कोरोना रुग्णांनाही दाखल करण्यात आले असून ते क्वारंटाईन केले आहेत. मात्र, क्वारंटाईन आणि सोशल डिस्टंन्सिंगची कुठलीही काळजी न घेता, मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी एकत्र येत आहेत. गांधी हॉस्पिटलमधील या नमाज अदा करण्यासाठी एकत्र आलेल्या मुस्लीम बांधवांचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटो स्पष्टपणे हे नागरिक क्वारंटाईन बेड सोडून नमाज अदा करण्यासाठी एकत्र आल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे हे तेच लोकं आहेत, जे दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात उपस्थित होते. दरम्यान, तेलंगणात आतापर्यंत ९६ कोरोनाग्रस्तांची प्रकरणे समोर आली असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वच नागरिक तबलिगी जमातच्या मरकज कार्यक्रमासाठी गेले होते.