नवी दिल्लीः देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकार आपापल्या स्तरावर ठोस उपाययोजना करत आहे. पण तरीही कोरोनावर पूर्णतः नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. कोरोनाच्या लढ्यात विरोधी पक्षही सत्ताधाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचं सध्या चित्र आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही कोरोनावरून मोदी सरकारला वेळोवेळी सल्ला देत असल्याचं आपण पाहिलंच आहे. राहुल गांधींनी आता मोदी सरकारकडे एक मागणी केली आहे. मोदी सरकारनं कोरोनासारख्या महारोगराईच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या छोट्या-मोठ्या उपकरणांना जीएसटी मुक्त करण्याची मागणी केली आहे.राहुल गांधींनी ट्विट करत सरकारकडे कोरोनाच्या लढ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वच छोट्या-मोठ्या उपकरणांवर जीएसटी वसूल केला जाऊ नये. या महारोगराईदरम्यान ही उपकरणं जीएसटीमुक्त करायला हवीत. रोगराई आणि गरिबीचे चटके सोसत असलेल्या जनतेला सॅनिटायझर, साबण, मास्क, हातमोजे यांसारख्या वस्तूंना जीएसटीतून सूट द्यावी. त्यावर जीएसटी आकारणं चुकीचं आहे. कोरोनाच्या लढ्यातील उपकरणं जीएसटीतून मुक्त करण्याच्या मागणीवर आम्ही कायम आहोत.
गेल्या 24 तासांत 1553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 59 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 28 दिवसांत पुदुचेरीमधील माहे आणि कर्नाटकातील कोडागु आणि उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. गोवा राज्य पूर्णपणे कोरोना मुक्त झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.