नवी दिल्ली - चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर परदेशात भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची, प्रवाशांची तपासणी केली जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे इटलीहून भारतात परतले आहेत. त्यावेळी राहुल यांनी कोरोनाची चाचणी केलीय का? असा सवाल भाजपाच्या एका खासदारांनी केला आहे.
इटलीहून परत आल्यावर राहुल गांधी यांनी हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीचा दौरा केला. त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. इटलीवरून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी केली आहे का? हे आधी राहुल गांधी यांनी सांगावं. भारतात दाखल होताच कोरोनाची चाचणी करायला हवी होती?, भारतात कोरोना व्हायरस पसरवायचा आहे का? असं भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी बुधवारी (5 मार्च) म्हटलं आहे. राहुल गांधी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यापूर्वी त्यांनी असं म्हटलं आहे.
राहुल गांधी इटलीहून परतले आहेत. आता विमानतळावर त्यांनी कोरोनाची तपासणी केलीय की नाही?, नागरिकांमध्ये जाण्यापूर्वी तरी राहुल गांधी यांनी कोरोनाची चाचणी करायला हवी होती. हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असं म्हणत बिधुरी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. 'मला राहुल गांधींना असे विचारायचे आहे की तुम्ही सहा दिवसांपूर्वीच इटलीहून परत आले आहात. आपण विमानतळावर चाचणी केली आहे का? आपण योग्य सुरक्षा उपायांचा अवलंब केला की आपण कोरोना व्हायरस भारतात पसरवू इच्छित आहात?' असं त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबद्दल माहिती दिली. आतापर्यंत फक्त 12 देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात होती. मात्र, यापुढे जगभरातील देशांमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची प्रवाशांची तपासणी केली जाईल, असे वर्धन यांनी सांगितले. भारतात आतापर्यंत कोरोनाची 25 रुग्ण असल्याची माहिती समोर आलं आहे. त्यामध्ये 16 नागरिक इटलीतून आलेले आहेत. तर, कोरोनाच्या 3 रुग्णांवर उपचार होऊन ते घरी परतले आहेत. देशातील सर्वच प्रमुख रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले.
देशातील सर्वच विमानतळांवर मिळून 5,89,000 जणांची तपासणी केली आहे. तर, तर प्रमुख आणि साधारण असलेल्या बंदरांवरही (पोर्ट) 15 हजार प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. तर, मंगळवारपर्यंत नेपाळ सीमारेषेवर 10 लाख लोकांची तपासणी केल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून दिली आहे. जगभरातील तज्ज्ञ सांगत आहेत की, कोरोना व्हायरस (COVID-19) टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, मोठ्या संख्येने लोक एकत्रित केले जाऊ नयेत. यासाठी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भाजप सरकारच्या काळात २000 कोटींची अनियमितता, कॅगचा ठपका
कोरोना विषाणू आता नोटिफाइड, आरोग्य विभागाची माहिती
कंपन्यांकडूनही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना अन् विशेष प्रशिक्षण; प्रवासाबाबत नवे नियम
एअर इंडियाची संपूर्ण मालकी ‘एनआरआय’ना देण्यास मुभा