CoronaVirus : राहुल गांधी, थरूर, अँटोनींनी दिले प्रत्येकी २.६६ कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 03:03 AM2020-03-28T03:03:24+5:302020-03-28T05:36:50+5:30
Coronavirus : गांधी, थरूर व अँटोनी हे केरळचे अनुक्रमे लोकसभा व राज्यसभेचे सदस्य आहेत.
थिरुवनंतपुरम : काँग्रेसचे नेते राहुल गांधी, ए. के. अँटोनी आणि शशी थरूर यांनी आपापल्या मतदारसंघांत कोरोना विषाणूविरुद्ध (कोविड-१९) लढण्यासाठी खासदारांना मिळणाऱ्या स्थानिक भाग विकास निधी योजनेतील (एमपीएलएडीएस) पैसा उपलब्ध केला आहे.
गांधी, थरूर व अँटोनी हे केरळचे अनुक्रमे लोकसभा व राज्यसभेचे सदस्य आहेत. राहुल गांधी यांनी २.६६ कोटी आपल्या वायनाड, थरूर यांनी २.६६ कोटी थिरुवनंतपुरम, तर ए. के. अँटोनी यांनी त्यांच्या अलाप्पुझा जिल्ह्यासाठी २.६६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या योजनेंतर्गत लोकप्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघात कोणत्या प्रकल्पावर निधी खर्च करायचा याची शिफारस करू शकतात. केरळमधील इतर लोकप्रतिनिधीही या योजनेंतर्गत राज्यात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी निधी मंजूर करतील, असे समजते.
केरळमध्ये ७८ हजारांपेक्षा जास्त जणांना सध्या कोरोनाची संशयित लक्षणे आहेत, म्हणून एक तर घरात किंवा रुग्णालयांत क्वारंटाईन केले गेलेले आहेत.
केरळमध्ये ११८ लोक कोरोना विषाणूच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत.
तत्पूर्वी, आधल्या दिवशी शशी थरूर यांनी टिष्ट्वटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या आवाहनात म्हटले होते की, ‘‘नव्या पार्लमेंट इमारतीसाठी काढून ठेवलेले २० हजार कोटी आणि सेंट्रल व्हिस्टासाठीचे १५ हजार कोटी रुपये कोविड-१९ शी लढण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत. याचा अर्थ प्रत्येक जिल्ह्यासाठी केवळ २० कोटी रुपये असतील. अतिभव्य इमारतींवर आजच्या परिस्थितीत एवढा खर्च करणे ही लांबणीवर टाकता येईल अशी चैन आहे.’’