नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. आजचा तिसरा दिवस असून दुसऱ्याच दिवशी अर्थमंत्र्यांनी हातावरचे पोट असलेल्या ८० कोटी गरिबांना १.७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यावर राहुल गांधी यांनी स्तुतीसुमने उधळत सरकार योग्य मार्गावर असल्याचे म्हटले होते. मात्र, आज त्यांनी त्याच्या उलटी भूमिका घेत टीका केली आहे.
लॉकडाऊनमुळे गरीब, शेतकरी, मजुरांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, आता लॉकडाऊनमुळे लोकांना त्रास होत आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी त्यावर सारसार विचार करावा. देशातील मजूर, गरीबांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. हे लॉकडाऊन गरीबांना आणि दुबळ्यांना बरबाद करून टाकणार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत हा आरोप केला आहे. यामध्ये त्यांनी एका न्यूज चॅनेलवर दाखविलेला मजुराच्या मुलाचा भूकेने व्याकुळ झालेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. ''लॉकडाउन आमच्या गरीब आणि दुर्बलांना नष्ट करेल. भारत काळा आणि पांढरा नाही. एका मोठ्या समुदायाला मोठा झटका दिला आहे. आपले निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतले पाहिजेत. या संकटाचा सामना करण्यासाठी अधिक संवेदनशील दृष्टीकोन आवश्यक आहे. अद्याप उशीर झालेला नाही.'', असा इशारा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.
राहुल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा त्याची आपबीती सांगत आहे. तो गेल्या ४ दिवसांपासून भुकेलेला आहे. त्याचे वडील बाजारात काही आणण्यासाठी बाहेर पडले तर पोलीस त्यांना मारहाण करत आहेत. एक महिला त्यांना खायला देण्यासाठी आली तेव्हा तिला पोलिसांनी हाकलून दिले. वडील आणि काकांना मारहाण केली, असा आरोप या मुलाने केला आहे.