नवी दिल्ली: देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं मोठी घोषणा केली आहे. मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत. यानंतर आता रेल्वे देशभरात मेल एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू करण्याच्या तयारीत आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. १ जूनपासून दररोज २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याचं गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या गाड्यांसाठी ऑनलाईन बुकिंग करता येईल. १ जूनपासून देशभरात २०० विशेष मेल एक्स्प्रेस चालवल्या जाणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी ट्विट करून दिली. या गाड्या वेळापत्रकानुसार धावतील. या गाड्यांमध्ये वेटिंग लिस्टचा पर्याय असेल. मात्र तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळसारखे पर्याय उपलब्ध नसतील. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन ट्रेनच्या तिकिटांचं बुकिंग करता येईल. ट्रेन बुकिंग केव्हापासून सुरुवात होईल, याची माहिती लवकरच दिली जाईल. श्रमिक आणि राजधानी विशेष गाड्यांच्या धर्तीवर आता मेल एक्प्रेस गाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. यामध्ये शताब्दी स्पेशल आणि इंटरसिटी स्पेशलचाही समावेश असू शकतो. या गाड्यांमध्ये तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळसारखे पर्याय उपलब्ध नसतील. मात्र वेटिंग तिकिटाचा पर्याय उपलब्ध असेल. श्रमिक आणि राजधानी स्पेशल गाड्यांमध्ये केवळ कन्फर्म तिकिटंच दिली जातात.