नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता जवळपास १०० पर्यंत पोहचली आहे. तर कोरोनामुळं ६५ वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. देशभरातील जवळपास सर्वच राज्यात लॉक डाऊन करण्यात आलंय. तरीही, लोकं घरातून बाहेर पडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेनं भावनिक ट्विट करुन नागरिकांना आवाहन केलंय.
कोरोनाचा धोका टाळ्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे राज्यात 31 मार्चपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केला. तर, देशभरातील ३० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्येही लॉक डाऊन आहे. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, अद्यापही लोकं गंभीरतेने घेत नाहीत. संचारबंदीच्या निर्णयानंतरही राज्यातील अनेक ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. विविध ठिकाणी लोकं एकत्र येत आहेत. त्याच पार्श्वभूमीर भारतीय रेल्वे मंत्रालयाने ट्विट करुन नागरिकांना गंभीर राहण्याचं आवाहन केलंय. भारतीय रेल्वे युद्ध काळातही कधी बंद राहिली नव्हती. त्यामुळे, सध्याच्या स्थितीचे गांभिर्य ओळखून घरीच राहा, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाने केले आहे.
रेल्वे मंत्रालयानने ३१ मार्चपर्यंत देशातील सर्वच रेल्वेसेवा ठप्प केली आहे. तसेच, मुंबईती लोकल सेवाही बंद झाली. लोकल आणि मेट्रो सेवांसह राज्यातील परिवहिन सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. यावरुन तरी नागरिकांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून सरकारी सूचनांचे पालन केले पाहिजे. पोलीस आणि प्रशासनास सहकार्य करुन घरीच थांबणे गरजेचे आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसचे साडे तीन लाख रुग्ण आढळून आले आहेत. करोनापासून जीव वाचवण्यासाठी 50 देशांमधील सरकारांनी सुमारे 100 कोटीपेंक्षा जास्त लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादु्र्भाव रोखण्यासाठी जगातील ३५ देशांनी लॉकडाउनची घोषणाही करण्यात आली आहे. त्याप्रमाणे अनेक देशांनी तर आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद केली असून देशांतर्गत वाहतूक व्यवस्थाही बंद केली आहे. संपर्क आणि संसर्गामुळे करोना होत असल्याने तो रोखण्यासाठी जगभरातील सर्व देशांकडून प्रयत्न केले जात आहेत.