जयपूर - कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे. कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,955 वर पोहोचली आहे. तर भारतात देखील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच रुग्णांची संख्या 171 पर्यंत पोहोचली आहे. भारतात आलेल्या एका कुटुंबाची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर सरकारने त्यांच्या घरापासून सरकारने 1 किमीपर्यंत कर्फ्यू लावल्याची माहिती समोर आली आहे.
राजस्थानमधील झुंझुनू येथील एका दाम्पत्यासह त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत कर्फ्यू लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 मार्च रोजी हे दाम्पत्य इटलीहून भारतात आलं होतं. भारतात परतल्यावर सरकारकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. जयपूर येथील सवाई मानसिंह रुग्णालयात या नमुनांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये दाम्पत्य आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला कोरोना असल्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे.
जे नागरिक या दाम्पत्याच्या संपर्कात आले असतील त्या सर्वांची चाचणी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कोरोनासोबत लढण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलवली होती. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाव्यात यासंदर्भात चर्चा करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच मॉल, शाळा, मंदिर, गर्दी होईल अशी ठिकाणं बंद ठेवण्याचा निर्णय राजस्थान सरकारनं घेतला आहे. अत्यावश्यक कामाविना बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली होती. त्यानंतर आता गुरुवारी (19 मार्च) 146 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशातील 16 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. यातील काहींना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 1, दिल्लीमध्ये 11, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 13, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 49, पंजाबमध्ये 3, तेलंगणामध्ये 12, राजस्थान 7, उत्तर प्रदेशमध्ये 17, लडाख 8, तमिळनाडू 2, जम्मू-काश्मीर 4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: हे विषाणूशी युद्धच; आम्ही लढतोय, पण तुमचं आणखी सहकार्य हवंयः मुख्यमंत्र्यांची साद
Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुग्ण?
Coronavirus : 'राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं'
Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर
मुंबईत दोन महिलांना कोरोनाची लागण; महाराष्ट्रात आकडा वाढला