इंदौर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार देशवासियांनी २२ मार्च रोजी जनत कर्फ्युचं पालन केलं. कोरोनासारख्या भयानक विषाणूचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचं या नागरिकांनी घरात बसून दाखवून दिलं. मात्र, सायंकाळी ५ वाजता एकत्र येऊन थाळीनाद, शंखनाद, टाळ्या वाजवणे आणि सेलिब्रेशन करणे, असे काही प्रकार घडल्याने या जनता कर्फ्युला गालबोट लागलंय. याबद्दल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनीही रस्त्यावर उतरुन शंख आणि थाळी वाजवून लोकांसमवेत एकत्र येत कृतज्ञता व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार पोलीस, डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्चमाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सायंकाळी ५ वाजता देश एकत्र झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या घराबाहेर, खिडकीत उभे राहून नागरिकांनी टाळी, थाळी, शंख नाद करुन अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, याच काळात देशातील अनेक भागात लोक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन जणू वर्ल्डकपची मॅचच भारताने जिंकली, असे सेलिब्रेशन केले. याबातचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील पीलभीत जिल्ह्यात चक्क जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनीच शंख वाजवत रॅली काढल्याचे पाहायला मिळाले. लोकांनी एकत्र येऊ नये, सुरक्षित अंतर ठेऊन राहावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी नियम न पाळल्याचे दिसून आले.
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओबाबत पीलीभीत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. एकतर्फा बातम्या चालविण्यात आल्या आहेत. पीलीभीतमध्ये अनेक ठिकाणी लोकं एकत्र जमले होते. त्यांच्यावर दवाब किंवा सक्तीचा प्रयोग शक्य नव्हता. त्यामुळे लोकांमध्ये मिसळूनच त्यांना याबाबत सांगण्यात आल्याचे पीलीभीत पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान, रविवारी जनता कर्फ्यूनिमित्त कडकडीत बंद पाळून देशातील जनतेने कोरोधाविरोधात लढण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. मात्र जनता कर्फ्यूला एक दिवस उलटतो न उलटतो तोच कोरोनाबाबतचे लोकांमधील गांभीर्य हरवले असून, लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. मुंबईतील काही ठिकाणी वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी संतप्त झाले असून, लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.