नवी दिल्लीः देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असतानाच केंद्र सरकार त्याला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PM Cares फंडाची घोषणा केल्यानंतर अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. PM Cares फंडाला अदानींनी १०० कोटी रुपये दिल्यानंतर आता रामदेव बाबांनीही २५ कोटी रुपयांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३५ कोटी जनतेला कोरोनाशी लढण्यासाठी केलेल्या आवाहनालाही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलं आहे.पतंजली समूहानंही २५ कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. रामदेव बाबा म्हणाले, पतंजली आणि रुचि सोया कंपनीचे कर्मचारीदेखील एक दिवसाचा पगार देणार आहेत. ही रक्कम जवळपास दीड कोटींच्या घरात आहे. पतंजलीशी संबंधित ग्राहकांनाही कोरोनाविरुद्धच्या युद्धात देशाची मदत करण्याचे आवाहनही रामदेव बाबांनी केले आहे. आपत्कालीन सेवांसाठी आमच्या पाच संस्थांतर्फे मदत करण्याची ऑफर दिली आहे. हरिद्वारचं योगाग्राम आणि पतंजली योगपीठ, मोदीनगर, गुवाहाटी, कोलकाता आणि सोलनमधले आमचे आश्रम उपचार आणि आयसोलेशनसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. या आश्रमांमध्ये जवळपास सुमारे 1500 बेड सामावू शकतात. त्याचा सर्व खर्च पतंजली समूह उचलण्यास तयार असल्याचंही रामदेव बाबांनी सांगितलं आहे.
CoronaVirus : PM Cares फंडाला रामदेव बाबांची भरघोस मदत; योग करण्याचा दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 8:05 PM