नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. अशातच रविवारी एकाच दिवसात देशभरात १ हजार ६१२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात ५५२, गुजरात ३६७ आणि उत्तर प्रदेशातून १७९ नवीन रुग्ण आढळलेत. आतापर्यंत या राज्यातील हा दिवसभरातील सर्वात मोठा आकडा आहे.
या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या जलदगतीने वाढली तसेच देशभरात रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ झाली. आतापर्यंत १७ हजार ३२५ कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्रात रविवारी १२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यासोबत गुजरात १०, मध्य प्रदेश ५ आणि तेलंगणा ३ कोरोनाग्रस्तांचा जीव गेला आहे. दिल्ली, केरळ आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी २ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण दिवसभरात ३९ लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
कोरोनाचे ५ अशुभ संकेत
रविवारी १ हजार ६१२ नवीन रुग्ण आढळले. एका दिवसात इतक्या संख्येने रुग्ण वाढणे हे पहिल्यांदा झालं आहे. यापूर्वी शनिवारी १ हजार २६६ नवीन रुग्ण आढळले होते.
एका दिवसात भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात एकूण कोरोना रुग्णांची संख्या १७ हजार ३२५ इतकी झाली आहे
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ हजारांच्या आसपास गेला आहे तर दिल्लीत ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
भारतात कोरोना व्हायरसचे ३६ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आणि दिल्लीत आहेत.
आतापर्यंत कोरोनामुळे भारतात ५६० लोकांचा जीव गेला आहे.
दरम्यान, गोव्यातून एक चांगली बातमी आली. गोवा देशातील कोविडमुक्त होणारं पहिलं राज्य बनलं आहे. येथे रविवारी उपचारानंतर सातव्या व शेवटच्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झाला आहे. रविवारी केवळ राज्यातच नव्हे तर मुंबईतही एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले. देशाच्या आर्थिक राजधानीत, ४५६ नवीन रुग्ण आढळले तर सहा लोकांचा मृत्यू झाला आहे.