कोगनोळी : महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक शासनाने महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी याठिकाणी प्रवाशांची रविवारपासून रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
आजपर्यंत कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले होते. ते नसेल तर लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता प्रवाशांनी केली नसल्यास त्यांची येथे तात्काळ रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात येत आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला तरच त्यांना राज्यात प्रवेश दिला जातो. या ठिकाणी चाचणी केलेल्या प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी दिवसभरात ४० प्रवाशांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना राज्यात प्रवेश देण्यात आला. या सीमा तपासणी नाक्यावर तालुका आरोग्य अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा सहाय्यक आर एम बागवान, आरोग्य सेविका सुमन पुजारी, औषध वितरक सारिका आवटे आदी कर्मचाऱ्यांकडून रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे.