नवी दिल्ली - कोरोनामुळे देशाच्या विकासाची चाके थांबली आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वंकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी आज दुपारी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. मात्र, कोरोनासाठी वैद्यकीय यंत्रणा सुधारणे आवश्यक आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विट करुन मोदी सरकारकडे २० हजार कोटी रुपये वळविण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पॅकेज जाहीर केले. तर, देशात २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहीर करण्यापूर्वी कोरोनाच्या आपत्तीसाठी १५ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र, मोदींनी जाहीर कलेल्या पॅकेजनुसार देशातील प्रत्येक जिल्ह्याला केवळ २० कोटी रुपये मिळतील. पण हे २० कोटी रुपये पुरेसे नसल्याचे थरुर यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे केंद्र सरकारने राष्ट्रपती भवनाच्या नवीन इमारतीसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, सरकारने हे २० हजार कोटी रुपयाचे पॅकेज रद्द करुन, ती रक्कम कोरोनाच्या आपत्तीसाठी वापरावे, अशी मागणीही थरुरु यांनी केली आहे. थरुर यांनी ट्विट करुन याबाबत मत व्यक्त केलंय.
दरम्यान, भारतामध्ये बुधवारी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे १३० कोटी लोकसंख्येला घर सोडण्यावर बंदी आणण्यात आली आहे. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात येत आहे. २020-21 या आर्थिक वर्षासाठी सरकार कर्ज वाढवू शकते. येत्या आर्थिक वर्षासाठी 7.8 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची सरकारची योजना आहे. आरबीआयला केंद्राचे बाँड खरेदी करण्यास सांगितले होते. मात्र, महागाईच्या भीतीने गेल्या दशकभरापासून आरबीआयने खरेदी केलेली नाही. यामुळे आता आरबीआला जगातील अन्य देशांसारखाच सरकारी बाँड खरेदी करावा लागणार आहे.