नवी दिल्ली – देशात आतापर्यंत १३ हजार ३८७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४३७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यांची संक्या ३ हजार २०२ इतकी आहे तसेच १९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाचे १ हजार ६४० रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यातील ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढून १३ हजार ३८७ झाली आहे. तर ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात कोरोनामुळे २३ लोक मरण पावले आहेत. पण देशात कोरोना प्रकरणात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोना संक्रमित रुग्णांपैकी १३.६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे आतापर्यंत ८० टक्के रुग्ण बरे आहेत. परंतु देशासाठी एकही मृत्यू ही चिंतेची बाब आहे. आपल्याला प्रत्येक आघाडीवर कोरोनाशी लढायचं आहे. आमचा प्रयत्न जोरात सुरु आहे. देशात अँटीबॉडीजवर काम चालू आहे. प्लाझ्मा टेक्निकल उपचारांवर काम करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच आमचं सर्व लक्ष लवकरात लवकर कोरोनावर लस विकसित करण्यावर आहे. सध्या कोविड १९ शी लढण्यासाठी पुनर्संचयित बीसीजी , उत्कृष्ठ प्लाझ्मा थेरपी, मोनोक्लोनल अँन्टीबॉडीजवर काम करत आहोत. मे महिन्यापर्यंत देशभरात दहा लाख आरटीपीसीआर किट बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. कोविड रुग्णांचे बरे होणे आणि मृत्यूदर यांचे प्रमाण ८०:२० इतके आहे. जे इतर देशांपेक्षा जास्त आहे असंही लव अग्रवाल यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना व्हायरस भारतात ३ महिन्यांसाठी आहे. त्याचं उत्परिवर्तन फार लवकर होत नाही. जेव्हा कधी या आजारावर लस तयार केली जाईल ती भविष्यात फायदेशीर ठरेल असं आयसीएमआरचे डॉक्टर रमन गंगाखेडकर यांनी सांगितले. त्याचसोबत कोरोनाशी लढा देण्यासाठी बीसीजी लस वापरण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारता असता ते म्हणाले की, पुढील आठवड्यापासून आयसीएमआर यावर अभ्यास सुरू करेल. जोपर्यंत आमच्याकडे यासंदर्भात निश्चित माहिती उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आरोग्य कर्मचार्यांनाही याची शिफारस करणार नाही असं डॉक्टर गंगाखेडकर यांनी सांगितले.