नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकार आपापल्या स्तरावर ठोस उपाययोजना करत आहे. पण तरीही कोरोनावर पूर्णतः नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. कोरोनाच्या लढ्यात विरोधी पक्षही सत्ताधाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचं सध्या चित्र आहे. तर, सरकारकडे गरिब व गरजूंनासाठी, नागरिकांसाठी सरकारी पॅकजची मागणीही विरोधकांकडून करण्यात येत आहे. जगभरातील कोरोनाच्या संकटात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मात्र, अद्यापही याचा फायदा देशातील सर्वसामान्य नागरिकांना झाल्याचे दिसून येत नाही.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही कोरोनावरून मोदी सरकारला वेळोवेळी सल्ला देत असल्याचं आपण पाहिलंच आहे. राहुल गांधींनी आता मोदी सरकारकडे एक मागणी केली आहे. मोदी सरकारनं कोरोनासारख्या महारोगराईच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या छोट्या-मोठ्या उपकरणांना जीएसटी मुक्त करण्याची मागणी केली होती. आता, राहुल गांधी यांनी कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीवरुन मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. तसेच, सरकार कधी ऐकणार? असेही राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय. कच्च्या तेलाच्या किमतीत गेल्या २० वर्षातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र, अद्यापही देशात पेट्रोल ६९ आणि डिझेल ६२ रुपये लिटर आहे. देशातील तेलाचे भाव कधी कमी होणार? असा प्रश्न राहुल यांनी विचारला आहे.
दरम्यान, न्यू यॉर्कच्या मर्कन्टाईल एक्स्चेंज (नायमेक्स) या बाजारामध्ये सोमवारी अमेरिकन कच्च्या तेलाचा दर उणे ३७ डॉलर प्रतिबॅरल (१५९ लिटर) झाल्याने जगभर खळबळ उडाली आहे. याचे कारण इतिहासात कच्चे तेल ११ डॉलर प्रतिबॅरलपेक्षा कधीही घसरलेले नाही. १९९९ साली कच्चे तेल ११ डॉलर प्रतिबॅरल झाले होते. त्यानंतर, आता २०२० मध्ये जगभरात कोरोनाचे संकट असलेल्या काळात, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.