नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी काही खाटा राखून ठेवून विलगीकरण कक्षांची सुविधा करण्यात यावी, अशा सूचना केंद्र सरकारने देशातील सर्व रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांना दिल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे केंद्र सरकारने एक सल्लापत्र (अॅडव्हायजरी) जारी करून या सूचना केल्या आहेत.रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये यांच्यासाठी जारी करण्यात आलेल्या या सूचनापत्रात कोरोनाच्या मुकाबल्यासाठी इतरही अनेक महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत. पुरेशा संख्येने व्हेंटिलेटर्स, हायफ्लो आॅक्सिजन मास आणि अतिरिक्त मनुष्यबळ याची व्यवस्था करण्याचा यात समावेश आहे.सूत्रांनी सांगितले की, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असली तरी अजूनही नियंत्रणातच आहे. आजाराबाबत अजून सामूहिक प्रसाराची अवस्था उद्भवलेली नाही. तथापि, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीच तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी रुग्णालये सुसज्ज असायला हवीत, या दृष्टीने सरकारने या सूचना जारी केल्या आहेत. भविष्यातील कुठल्याही परिस्थितीचा समर्थपणे मुकाबला करणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक संसाधने देशभर अधिकाधिक समान पातळीवर वितरित होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे.५० पेक्षा अधिक वयाच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना इच्छेनुसार मिळणार सुटी- ५० पेक्षा अधिक वय असणाºया केंद्र सरकारच्या कर्मचाºयांना वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय ४ एप्रिलपर्यंत सुटीवर जाता येईल, असे निर्देश कार्मिक मंत्रालयाने जारी केले आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.- कर्मचाºयांचे सुटीसाठीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. जे अधिकारी, कर्मचारी स्वत:हून वेगळे राहू इच्छितात त्यांची सुटी मंजूर करण्याचे निर्देशही केंद्र सरकारच्या सर्व विभागांना देण्यात आले आहेत.- ज्या कर्मचाºयांचे वय ५० पेक्षा अधिक आहे आणि ज्यांना मधुमेह, श्वसनाचे विकार, मूत्ररोग आणि जीवघेणे आजार आहेत त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय रजा मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Coronavirus : कोरोनासाठी खाटा राखून ठेवा, कक्ष तयार ठेवा; केंद्र सरकारचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 4:15 AM