मेरठ: संपूर्ण जगात सध्या कोरोनानं थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी देशाला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे मेरठमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मोहिंदर सिंह यांनी १५.११ लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा केले आहेत. लष्करातून ज्युनियर कमीशन ऑफिसर पदावरून निवृत्त झालेल्या मोहिंदर यांनी ग्रॅच्युटी, पेन्शन आणि वेतनातून बचत केलेली सर्व रक्कम कोरोनाशी दोन हात करण्यासाठी देशाला दान केली आहे.मला जे काही मिळालंय, ते याच देशातून मिळालंय. आता देशाला गरज आहे. त्यामुळे देशाचा पैसा मी देशाला परत करतोय, अशा शब्दांत मोहिंदर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपला एक डोळा गमावलेले मोहिंदर सिंह पत्नी सुमन चौधरी यांच्यासोबत राहतात. त्यांनी पत्नीसह पंजाब अँड सिंध बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेत मदतीचा धनादेश सुपूर्द केला.माझं वय आता ८५ वर्षे आहे. इतकं पैसे घेऊन मी कुठे जाणार आहे?, असा प्रश्न मोहिंदर यांनी १५ लाख रुपये दान केल्यानंतर विचारला. मी दान केलेली रक्कम लोकांच्या कामी येणार आहे, याचा मला आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. मोहिंदर यांना दोन मुलगे असून त्यांची एक मुलगी परदेशात नोकरी करते. मेरठमधील ११ भागांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त असल्यानं तिथे पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मेरठमध्ये कोरोनाचे ११ हॉटस्पॉट असून त्यांच्यावर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे. घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर ड्रोनची नजर असून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. पोलीस कंट्रोल रुममधून ड्रोनद्वारे मिळणाऱ्या दृश्यांवर लक्ष्य ठेवलं जात असल्याची माहिती मेरठचे एडीजी प्रशांत कुमार यांनी दिली.
CoronaVirus: 'देशाचे पैसे देशालाच देतोय'; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून ग्रॅच्युटी, पेन्शनचे १५ लाख दान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:07 AM