नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 1000हून अधिक झाली आहे. या जीवघेण्या रोगाशी लढण्यासाठी मोदींनीही PM Cares फंडाची घोषणा केली असून, अनेक जण या पीएम फंडाला सढळ हस्ते मदत करत आहेत. अदानींनी १०० कोटींची मदत दिली असून, रामदेव बाबांनीही २५ कोटी दिले आहेत. टाटा, महिंद्रासारख्या उद्योगपतींनीही कोरोनाच्या लढ्यासाठी कोट्यवधींची रक्कम दिली होती.आता रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानींनी मोदींच्या पीएम फंडाला मदत करण्यासाठी तिजोरी उघडली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं मोदींनी सुरू केलेल्या अभियानात योगदान देण्यासाठी ५०० कोटींचा निधी जाहीर केला आहे. तसेच रिलायन्सनं ५-५ कोटी अनुक्रमे गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत. येत्या 10 दिवसात 5 लाख लोकांना जेवण दिले जाणार असल्याचंही रिलायन्सनं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स फाऊंडेशनने कोरोना रुग्णांसाठी सेव्हन हिल रुग्णालयात अवघ्या 2 आठवड्यात मुंबईत 100 बेडचं विलगीकरण कक्ष तयार केले होते. रिलायन्सदेखील 1 लाख मास्क आणि हजारो पीपीई वैयक्तिक संरक्षक उपकरणे तयार करीत आहे. जेणेकरून देशातील आरोग्य कर्मचार्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. रिलायन्स आधीच आपत्कालीन वाहनांमध्ये विनामूल्य इंधन आणि डबल डेटा प्रदान करीत आहे.या निधीच्या घोषणेनंतर मुकेश अंबानी म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की, भारत कोरोनो विषाणूच्या आपत्तीवर लवकरात लवकर विजय मिळवेल." रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण टीम या संकटांच्या काळात देशासोबत आहे आणि कोरोनाविरुद्धचा हा लढा जिंकण्यासाठी शक्य तेवढी मदत करेल.
CoronaVirus : मुकेश अंबानींनी तिजोरी उघडली; मोदींच्या फंडाला दिली कोट्यवधींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 8:42 PM