नवी दिल्ल्ली : देशात कोरोना व्हायरस दुसऱ्या टप्प्यात पोहोचला असून व्यापारी आस्थापनांनाही आता टाळे लागू लागले आहे. देशात आतापर्यंत १४५ जण कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले असून मंगळवारीच केंद्रीय राज्यमंत्र्यांनी विलग करून घेतल्याची बातमी आली होती. यामुळे आता कोरोनापासून भारतीय संसदही दूर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारी कार्यालये, खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी बंद करण्यात आली आहे. तसेच हँड सॅनिटायझर लावून आतमध्ये प्रवेश करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच घरांमध्येही आता सॅनिटायझरचा साठा करून ठेवण्यात येत असल्याने बाजारात सॅनिटायझरची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका गेले दोन दिवस संसदेलाही बसला आहे.
बाजारात कमी प्रतीचे किंवा बनावट सॅनिटायझर मास्क जास्त किंमतीला विकले जात आहेत. यावर कारवाई होत असताना संसदेमध्येही सॅनिटायझर आणि सुरक्षारक्षकांना मास्क पुरविण्यासाठी बाजारात गेलेल्या कंत्राटदाराला हात हलवत माघारी यावे लागले आहे.
संसदेत साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्लोव्हज मिळाले आहेत. मात्र, मास्क हवे तेवढ्या संख्येने मिळालेले नाहीत. सॅनिटाझरच्याही काही बॉटल मिळाल्या असून त्या अधिकाऱ्यांसाठी राखीव असल्याचे सांगण्यात आले. यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना साबनानेच हात धुवावे लागत आहेत.
संसदेमध्ये भेट देणाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला असला तरीही अधिकारी येत असतात. त्यांची तपासणी करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटाझरची कमतरता भासू लागली आहे.
संसद भवनामध्ये गेट नंबर १२वर सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी ठेवण्यात आलेले सॅनिटायझर सोमवारीच संपले. मंगळवारी त्यांनी सॅनिटायझरविनाच लोकांची तपासणी केली.
शास्त्री भवनामध्ये पंतप्रधान जनऔषधी केंद्र आहे. तिथेही सॅनिटायझर उपलब्ध नाही. दोन रुपयांना मिळणारे मास्क या केंद्रामध्ये ३० रुपयांना मिळत असल्याने ते ठेवण्यात आलेले नाही. तर कापडाचे मास्क उपलब्ध असून ते ५० रुपयांना विकले जात आहे.
खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वीच देशवासियांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.