नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून जारी एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. देशाची भ्रष्टाचारविरोधी सर्वोच्च संस्था केंद्रीय दक्षता आयोगाचे (सीव्हीसी) प्रमुख के. व्ही. चौधरी यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी जूनपासून हे पद रिक्त होते. राष्ट्रपती भवनात शनिवारी सकाळी १०.३० वाजता एका समारंभात संजय कोठारी यांनी दक्षता आयुक्तपदाची शपथ घेतली. यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एका उच्चस्तरीय निवड समितीने फेब्रुवारीत कोठारी यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यावेळी काँग्रेसने याचा विरोध करीत दक्षता आयुक्त नियुक्तीसाठीची प्रक्रिया बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचे म्हटले होते. कोठारी यांच्या नियुक्तीनंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढू शकतो.>1978च्या बॅचचे कोठारी हे हरयाणा केडरचे आयएएस अधिकारी होते. २०१६ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना पीईएसबीचे प्रमुख म्हणून नेमले होते. जुलै २०१७ मध्ये त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव नियुक्त केले होते. दक्षता आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती एका निवड समितीच्या शिफारशीवर करतात. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान आणि सदस्य गृहमंत्री व लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतात. दक्षता आयुक्तांचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो.
CoronaVirus : केंद्रीय दक्षता आयोगाचे संजय कोठारी नवे आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 3:41 AM