नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन हटवल्यानंतर आता देशात अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, अनलॉकिंगचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाच्या संकटकाळात कायद्याचे योग्य पालन व्हावे यासाठी महत्त्वाचे आदेशही दिले.
देशवासियांना संबोधित करताना मोदींनी अनलॉक-१ दरम्यान, लोकांचा बेजबाबदारपणा वाढल्याने नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, लॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात येत होते. आता देशातील जनतेने तशाच प्रकारची सतर्कता दाखवण्याची गरज आहे. जे लोक नियमांचे पालन करत नसतील त्यांना रोखले पाहिजे. त्यांना समजावले पाहिजे. विशेषत: कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांचे कठोरपणे पालन झाले पाहिजे. एका देशाच्या पंतप्रधानांना सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय फिरल्याने दंडाला सामोरेर जावे लागले हे तुम्ही बातम्यांमध्ये पाहिले असेलच. आथा आपल्याकडेही स्थानिक प्रशासनाने अशी कारवाई समोरच्या व्यक्तीचे पद, प्रतिष्ठा विचारात न घेता केली पाहिजे.
दरम्यान, मोदींनी आज पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या पुढच्या पाच महिन्यांसाठी विस्तार करण्याची घोषणाही केली. पुढच्या काळात येणारे सणवार विचारात घेऊन पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि षटपूजा म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंत करण्याचा निर्णय घेतल्याचे मोदींनी जाहीर केले. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देणारी ही योजना नोव्हेंबरमध्येही सुरू राहील, असे मोदींनी स्पष्ट केले. सरकारद्वारा या पाच महिन्यांसाठी ८० कोटीहून अधिक बंधु-भगिनींंना ५ किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ प्रत्येक व्यक्तीसाठी मोफत देण्यात येत आहे. तसेच, प्रत्येक कुटुंबाला 1 किलो हरभरा डाळही मोफत मिळेल. या योजनेच्या विस्तारात ९० हजार कोटीहून अधिक खर्च झाला असून गेल्या तीन महिन्यांचा खर्चही जोडला तर दीड लाख कोटी रुपये खर्च होतात, असेही मोदींनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या