गुडगाव : देशात कोरोनाच्या धास्तीने लॉकडाऊनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. वाहतूक बंद झाल्याने त्याचा फटका घरी जाण्याच्या वाटेवर असलेल्या लोकांना बसला आहे. बरेचशे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. काही लोकांनी शेकडो किमीचा प्रवास पायीच करण्याचा निर्णय घेतल्याने जथ्थेच्या जथ्थे राजस्थान, बिहारला निघाल्याचे चित्र आहे.
गुडगावमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. देशाच्या राजधानीच्या बाजुलाच असलेल्या या भागात कोरोनाची धास्ती एवढी आहे की भर उन्हात चालता चालता रस्त्यात चक्कर येऊन पडलेल्या तरुणाला कोणीच उचलून बाजुला ठेवण्यासाठी मदतीला धावले नाही. तो तरुण तसाच उन्हामध्ये रस्त्याच्या मधोमध पडून होता. त्याच्यावरून वाहन जाऊ नये म्हणून आजुबाजुला जमलेल्यांना दोन टायर लावले होते. तसेच काही जण त्याच्या तोंडावर काही अंतरावरून बाटलीचे पाणी मारत होते.
अखेर तेथे उपस्थितांनी पोलिसांच्या कंट्रोल रुमला याची माहिती दिली. यानंतर २५ मिनिटांनी त्याला सरकारी मदत मिळाली. धक्कादायक म्हणजे अँम्बुलन्सच्या नियंत्रण कक्षाला १०८ या नंबरवर अनेकदा फोन करूनही समोरून फोन उचलण्यात आला नाही. सिव्हिल सर्जन जे एस पुनिया यांना याची माहिती देण्यात आल्यानंतरही पुढचा पाऊण तास कोणतीही मदत पोहोचली नाही. जवळपास ४० मिनिटांपर्यंत दोन पत्रकारांनीही मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस कंट्रोल रुमला वारंवार फोन करण्यात येत होते. मात्र, त्यांच्याकडून ४० मिनिटांनी परत फोन आला आणि अॅम्बुलन्स पाठवत असल्याचे सांगितले.
कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे तिथे उपस्थित कोणीही त्या तरुणाला हात लावायला तयार नव्हता. एवढेच नाही तर तेथून जाणाऱ्या क्लाऊड ९ हॉस्पिटलच्या अँम्बुलन्सला थांबविण्यात आले होते. मात्र, त्या चालकाने तरुणाला घेऊन जाण्यास नकार दिला. या तरुणाचे नाव दिल बहादुर असे होते. तो नेपाळचा रहिवासी होता. कर्फ्यूमुळे तो रेवाडीचे गुडगाव पायी चालत आला होता. वाटेत चक्कर आल्याने तो रस्त्यावरच पडला. यानंतर ५५ मिनिटांनी त्याला अँम्बुलन्सने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.