नवी दिल्ली: देशात लागू असलेला ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतता असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. देशभरात लॉकडाऊन वाढल्यानंतर गृहमंत्रालयाकडून आज नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो, सब यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, सर्व आंतरराज्यीय विमानवाहतूक, ट्रेन (पॅसेंजर), सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शियल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहे.
केंद्र सरकारकडून रुग्णालये, किराणा दुकान, शेती, ऑनलाईन टीचिंग, मासेमारी या सर्वांना सवलती देण्यात आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क घालणं देखील अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.