नवी दिल्ली: देशभरात गेल्या २४ तासांत ३१ हजार ४४३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या ११८ दिवसातील ही सर्वांत कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सध्या ४ लाख ३१ हजार ३१५ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ४६ हजार ००७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०० लाख ६३ हजार ७२० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. देशात एका दिवसाला ३ लाखांच्या पुढे आढळणारी कोरोना रुग्णसंख्या आता ५० हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे.
कोरोनाची दुसरी लाट मानवी प्रयत्नांनी रोखणं शक्य नव्हतं, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. देशात तिसरी लाट येण्याची शंका व्यक्त होत असतानाच अमित शाह यांनी गुजरातमधल्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे.
इंडियन मेडिकल असोसियशनने (Indian Medical Association)दिलेल्या एका इशाऱ्यामुळे चिंता वाढणार आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे आणि ती लवकरच येईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी इतक्यात कोरोना निर्बंधातून सूट देऊ नये, अशा इशारा इंडियन मेडिकल असोसियशनने दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे आणि कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. असे केल्यानेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येईल, असं आयएमएने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जागतिक पुरावे आणि महामारीचा इतिहास पाहता तिसरी लाट नक्की येणार आहे, असा दावा केला आहे.
कोरोनाची तिसरी लाट ४ जुलैलाच सुरू-
कोरोनाची दैनंदिन प्रकाशित होणारी आकडेवारी आणि पहिल्या दोन लाटांचे पॅटर्न यांचा तौलनिक अभ्यास केला असता, दुसरी लाट ४ जुलै रोजी सुरु झाली आहे, असं हैद्राबाद विद्यापीठातील प्रसिद्ध अभ्यासक डॉ. बिपीन श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जशी परिस्थिती होती, तशीची परिस्थिती जुलैच्या पहिल्या आठवड्यात होती, असं डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.