नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्णांची (Coronavirus in India) संख्या ही चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतची धक्कादायक माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टमधून (SBI Reports on Coronavirus in India)समोर आली आहे. या रिपोर्टनुसार देशातील कोरोनाची दुसरी लाट ही १०० दिवसांपर्यंत प्रभावी राहण्याची शक्यता आहे. बँकेने १५ फेब्रुवारीपासून कोरोनाच्या रुग्णांच्या मोजणीस सुरुवात केली आहे. २३ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये २५ लाखांपर्यंत रुग्ण सापडतील. (Second wave of coronavirus to affect India for 100 days, 2.5 million new patients to be found, SBI Reports)
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू आहे. दररोजच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. २३ मार्चपर्यंतचा कल पाहिल्याच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील एकूण रुग्णांची संख्या २५ लाखांपर्यंत होऊ शकते. या रिपोर्टनुसार देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पिक हा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येईल. कोरोनाला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कुठलाही खास प्रभाव दिसून येत नाही आहे. आता केवळ मोठ्या प्रमाणावरील लसीकरणा हाच कोरोनाविरोधातील या लढाईमध्ये लसीकरण हा एकच उपाय दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये त्याचा प्रभाव दिसून येत आहे, असेही या रिपोर्टमध्ये म्हटल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, अनेक राज्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा आणि लावलेल्या निर्बंधांचा प्रभाव पुढील महिन्यापासून दिसायला सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये हाय फ्रिक्वेंसी इंडिकेटर्सच्या आधारावरील बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्स घसरला आहे. आता लसीकरणाचा वेग वाढवणे हाच या साथीविरोधातील एकमेव पर्याय उरला आहे. सध्या सुरू असलेल्या दररोजच्या ४० ते ४५ लाख लोकांच्या लसीकरणाच्या वेगाने ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण हे पुढील चार महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ५३ हजार ५ृ४७६ नवे रुग्ण सापडले आहेत. ही गेल्या पाच महिन्यांमध्ये देशात सापडलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी देशातील १८ राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या डबल म्युटेट व्हेरिएंट मिळण्याबाबत चिंता व्यक्त करत लोकांना कोरोना गाइडलाइनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.