नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (Corona Virus) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत जात असून, देशभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. त्यामुळे आता यानंतर यावरून राजकारण तापण्याची चिन्हे असल्याचे बोलले जात आहेत. (coronavirus second wave more aggressive 300 percent faster)
काही संशोधक आणि शास्त्रज्ञांच्या मते देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट अधिक आक्रमक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग ३०० टक्के अधिक तीव्र असल्याचा दावा केला जात आहे. गतवर्षी म्हणजेच सन २०२० मधील मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर जुलै महिन्यात दररोज ६० हजार रुग्ण आढळून येत होते.
coronavirus: अग्रलेख - लॉकडाऊनचे डोहाळे थांबवा!
गेल्या ३० दिवसांत तीन लाख कोरोना रुग्ण
गतवर्षीच्या जुलैप्रमाणेच आताच्या घडीला प्रतिदिन रुग्ण संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या ३० दिवसांत तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढत राहिली, तर यावर नियंत्रण मिळवणे कठीण होईल, अशी भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही २०० टक्के वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाचे तब्बल ६८,०२० नवे रुग्ण
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ६८,०२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २९१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून, रुग्णांची एकूण संख्या ०१,२०,३९,६४४ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशात ०१,६१,८४३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात ४० हजार ४१४ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९५ टक्क्यांवर आले आहे.