चंदिगड - देशभरात कोरोनाचा फैलाव होत असताना पंजाबमध्ये मात्र कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आले होते. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून पंजाबमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटले आहे. दरम्यान, पंजाबमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग सिद्धू यांनी महाराष्ट्र सरकारवर पुन्हा गंभीर आरोप केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बलबीर सिंह सिद्धू म्हणाले की, ‘’नांदेडमधील हजूर साहिब येथून पंजाबमध्ये परतलेल्या भाविकांच्या चाचण्या महाराष्ट्र सरकारने घेतल्या नव्हत्या. त्यामुळे आम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जर महाराष्ट्र सरकारने चाचण्या घेतल्या नव्हत्या तर त्याची किमान आम्हाला माहिती द्यायला हवी होती, ‘’अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील नांदेडमधून पंजाबला गेलेल्या अनेक भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तसेच पंजामधील कोरोनाबाधितांच्या आकड्यातही दुपटीने वाढ झाली आहे. पंजाबमध्ये शुक्रवारी ५८५ कोरोनाबाधित होते, तो आकडा रविवारी १ हजार १०२ झाला आहे.
देशात आतापर्यंत कोरोनाचे ४२ हजार ५३३ रुग्ण सापडले आहेत. पैकी ११ हजार ७०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात सध्याच्या घडीला कोरोनाचे २९ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. १ मे ते ३ मे या अवघ्या तीन दिवसांच्या काळात देशात कोरोनाचे तब्बल साडे सात हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.