नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर तबलीगी जमातींचा मुद्दा उपस्थित केला.
शरद पवार यांनी पंतप्रधानांसमोर तबलीगींचा मुद्दा उपस्थित करत तबलीगींबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या वार्तांकनाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच हे प्रकरण एवढे वाढवणे योग्य नाही, अशी भूमिका मांडली. दर दिवशी तबलीगीबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे देशातील वातावरण बिघडत आहे, अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत, असे शरद पवार म्हणाले. दरम्यान, पवार यांच्या विधानाशी मोदींनीही सहमती व्यक्त केली, असे या बैठकीला उपस्थित असलेल्या गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार यांनी काल फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना दिल्लीतील तबलीगी प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली होती. 'दिल्लीत योग्य खबरदारी घेतली असती तर वृत्तवाहिन्यांवरून एखाद्या वर्गाचे वारंवार वेगळे चित्र निर्माण केले गेले नसते. तसेच एखाद्या वर्गाचे असे चित्र निर्माण करून त्यात सांप्रदायिक भर घालण्याची संधी वृत्तवाहिन्यांना मिळाली नसती, असे शरद पवार म्हणाले होते. त्याचप्रमाणे दिल्लीमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाबाबतच्या बातम्या वारंवार टिव्हीवर दाखवण्याची काय गरज आहे, असा सवाल देखील शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला होता.
सध्याच्या परिस्थितीत समाजातील सर्व घटकांनी एकत्र राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावरील मेसेज काळजी करण्यासारखे आहे. कारण पाचपैकी चार मेसेज खोटे असतात. पुन्हा पुन्हा हे मेसेज व्हायरल करून खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच यामागे कुणाचे षडयंत्र आहे का? याची शंका येते, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले होते.