नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. दहा हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाची मागणी केली आहे. मात्र, भारताने या औषधाच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. यावर, भारताने हे निर्बंध मागे घेतले नाही, तर कारवाई करू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. यावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.
शशी थरुर यांनी यासंबंधीचे ट्विट केले आहे. ते म्हणाले, "जागतिक मुद्द्यांच्याबाबतीत माझ्या दशकांच्या अनुभवात मी कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्ष किंवा सरकारला दुसर्या देशाच्या सरकारला उघडपणे धमकी देताना ऐकले नाही. मिस्टर राष्ट्राध्यक्ष? ज्यावेळी भारत आपल्याला हे औषध विकण्याचा निर्णय घेते, त्यावेळी आपल्यासाठी हा पुरवठ्याचा विषय होईल. भारतात जी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन तयार केली जाते, ती भारताच्या पुरवठ्यासाठी आहे."
भारत आणि अमेरिकेच्या उत्तम व्यापारी संबंधांचा संदर्भ देत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले जातील, अशी आशा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली. तसेच, भारताने निर्बंध न उठवल्यास कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य मागितले होते. मलेरियासारख्या आजाराचा सामना करण्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन उपयुक्त आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करतानाही हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मोठी मदत होते.