हैदराबाद - आईसाठी आपली मुलं ही जीव की प्राण असतात. आपल्या मुलांसाठी आई काहीही करू शकते, हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पाहिले असेल. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान याचाच प्रत्यय घडवणारी एक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक वेगवेगळ्या राज्यात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकून पडलेल्या मुलाला परत घरी आणण्यासाठी आईने जे काही केले ते वाचून तुम्ही तिच्या मातृत्वाला सलाम ठोकल्याशिवाय राहणार नाही.
ही घटना तेलंगणामधील आहे. येथील रझिया बेगम या महिलेचा मुलगा लॉक डाऊनमुळे आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथे अडकून पडला होता. त्याला परत आणण्याचा निश्चय या आईने केला आणि स्कुटीवरून तब्बल 1400 किलोमीटर अंतर कापत मुलाला परत सुखरूप घरी आणले.
निजमाबाद येथील एका सरकारी शाळेत कार्यरत असलेल्या रझिया बेगम यांना दोन मुलगे आहेत. काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. दरम्यान, त्यांचा धाकटा मुलगा निजामुद्दीन हा एमबीबीएसच्या पात्रता परीक्षेची तयारी करत आहे. दरम्यान, 12 मार्च रोजी तो आपल्या मित्राला सोडण्यासाठी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथे गेला होता. तो तिथे काही दिवस राहिला. मात्र त्याचदरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाल्याने तो तिथेच अडकून पडला. त्याला घरी परतायचे होते, मात्र परतण्यासाठी कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. इकडे मुलाच्या आठवणीने रझिया यांचा जीव बैचेन होत होता.
अखेरीस त्यांनी नेल्लोर येथे जाऊन मुलाला परत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी स्थानिक पोलिसांची परवानगी घेतली आणि 6 एप्रिल रोजी प्रवासास सुरुवात केली. सलग प्रवास करून त्या दुसऱ्या दिवशी दुपारी नेल्लोरला पोहोचल्या. त्यानंतर मुलाला सोबत घेत त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घरी पोहोचल्या.
'एक महिला म्हणून माझ्यासाठी दुचाकीवरून प्रवास करणे सोपे नव्हते. मात्र मुलाला परत आणण्यासाठीच्या प्रबळ इच्छाशक्तीसमोर ही भीती गायब झाली. रस्त्यावर वाहतूक असल्याने निर्मनुष्य असलेले रस्ते भीतीदायक वाट होते. मात्र मी प्रवास सुरूच ठेवला आणि मुलाला परत आणले,' अशी प्रतिक्रिया या महिलेने दिली.