मुंबई: कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दिल्लीत गेल्या महिन्यात तबलिगी समाजाकडून मरकजचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आल्यानं खळबळ माजली आहे. तबलिगी समाजाचे शेकडो जण विविध राज्यांत परतल्यानं देशातल्या राज्य सरकारांचे धाबे दणाणले आहेत. यावरुन शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीतले पोलीस मोदी, शहांच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यांना वेळीच आदेश का देण्यात आले नाहीत, असा प्रश्नदेखील राऊत यांनी विचारला.देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं म्हणजे देशद्रोह असल्याचं राऊत म्हणाले. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. देशात संवेदनशील परिस्थिती असताना अशा प्रकारची कृती म्हणजे मस्तवालपणा आणि मूर्खपणा आहे. फरहान अख्तर, जावेद अख्तर, नवाजुद्दीन सिद्धीकी यांच्यासारख्यांनी यावर टीका केली आहे. मात्र त्या समाजाचे नेते यावर मूग गिळून गप्प आहेत, असं राऊत यांनी म्हटलं.दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे दोन सरकारं काम करतात. १८ मार्चला निझामुद्दीन भागात झालेल्या कार्यक्रमाला शेकडो लोकांची गर्दी झाली. कोरोनाचा धोका वाढत असताना इतक्या झुंडी येत असल्याचं दोन्ही सरकारांच्या लक्षात आलं नाही का? की त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलली?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दिल्लीतील पोलीस यंत्रणा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या नियंत्रणाखाली येते. सध्या चार लोक दिसताच दंडुके मारणारे पोलीस त्यावेळी इतक्या झुंडी येत असताना काय करत होते?, असा सवाल विचारत त्यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. सध्याची परिस्थिती पाहता केंद्रानं निर्घृणपणे आणि अमानुषपणे काम करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असंदेखील राऊत यांनी म्हटलं.
CoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते? मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 7:46 PM