इंदोर : जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार माजला आहे. देशात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यातच इंदोरमध्ये अशी एक घटना घडली की, आरोग्य विभागाची टीम येथील टाटपट्टी बाखलमध्ये काही महिलांची तपासणी करण्यासाठी पोहोचली असता, या टीमवर स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोग्य विभागाची एक टीम येथील वयस्कर महिलेला मेडिकल चेकअप करण्यासाठी घेऊन जाणार होती. मात्र, यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांचे बॅरिकेड सुद्धा तोडले आणि मेडिकल टीमला मारहाण करत त्यांच्यावर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कारवाई करत लोकांवर नियंत्रण मिळविले.
असेही सांगण्यात येत आहे की, या परिसरात अनेक लोक बाहेरून आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या लोकांची आरोग्य विभागाच्या टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, इंदोरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री एमजीएम मेडिकल कॉलेजने कोरोना बाधितांचा अहवाल जारी केला. यामध्ये तीन मुलांचाही समावेश आहे.
देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत ४०० ने वाढ झाली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील संक्रमणवाढ नसून, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांनी प्रवास केल्यानंतर ही वाढ झाल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात १९०० रुग्ण आणि ५८ बळी आहेत. मागील २४ तासांत १३२ जण बरे झाले किंवा रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी सांगितले की, "रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही राष्ट्रीय स्तरावरील वाढ नोंदवत नाही. मात्र, यात कुठेही काही कमी झाले तर ती संख्या वाढू शकते. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, यासाठी लोकांनी सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्त्वे पाळावीत. गर्दी टाळावी."