भोपाळ - देशात कोरोनाचा फैलाव होत असतानाही उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (coronavirus in India) मात्र या कुंभमेळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. (haridwar kumbh mela 2021) कुंभमेळ्यात सहभागी होऊन देशाच्या विविध भागात गेलेल्या भाविकांच्या माध्यमातून कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. मध्य प्रदेशमधील विदिशा येथे कुंभमेळ्यातून परतलेल्या ८३ भाविकांपैकी ६१ भाविकांची तपासणी केली असता त्यापैकी ६० भाविकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. तर उर्वरित २२ भाविकांची काही माहिती मिळत नाही आहे. (Out of 61 devotees returning from Kumbh Mela, 60 were infected with coronavirus)
ही घटना मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्हा मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या ग्यारसपूर येथे घडली आहे. विदिशामधील जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ८३ भाविक तीन वेगवेगळ्या बसमध्ये बसून ११ ते १५ एप्रिलदरम्यान हरिद्वार येथे गेले होते. हे भाविक २५ एप्रिल रोजी ग्यारसपूर येथे परतले होते. मात्र कुंभमेळ्यासाठी गेलेल्या ८३ भाविकांपैकी केवळ ६१ भाविकांचीच माहिती मिळाली आहे. तर २२ जणांची माहिती मिळालेली नाही. त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, माहिती मिळालेल्या ६१ भाविकांपैकी ६० जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पॉझिटिव्ह सापडलेल्या ६० पैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. याशिवाय ५५ संशयितांना होम क्वारेंटाइन करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांवर लक्ष ठेवून आहोत. कारण जर त्यांने वेळीच विलगीकरणात ठेवले नाही तर ते सुपर स्प्रेडर बनतील.
हरिद्वारमध्ये आयोजित कुंभमेळ्यादरम्यान अनेक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत होते. तसेच यादरम्यान अनेक साधू संतांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे जसजसे हे साधुसंत माघारी परततील तसतसा कोरोनाचा धोका अधिकाधिक वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झाले आहे.