अहमदाबाद - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी दिवस रात्र एक करून कोरोनाबाधित रुग्णांना बरे करण्यासाठी उपचार करत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काहीजण संधीचा गैरफायदा घेऊन कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे समोर येत आहे.
असाच एक प्रकार गुजरातमधील सूरत येथून समोर आला आहे. गांधीनगर येथून आलेल्या एफडीआयच्या टीमने सूरतमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या नावावर खोट्या इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एफडीआयने पाच जणांना अटक केली असून, ही टोळी कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या टोसिलिजूमॅब या इंजेक्शनच्या नावावर नकली इंजेक्शनचा पुरवठा करत होती.
दरम्यान, या टोळीकडून मोठ्या प्रमाणावर टोसिलिजुमॅबची बनावट इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. या इंजेक्शनची अंदाजित किंमत सुमारे ८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अहमदाबादमदील संजीवनी रुग्णालयात सेवा देत असलेल्या एका डॉक्टरला रुग्णावर उपचार करत असताना टेसिलिजुमॅब इंजेक्शनबाबत शंका आल्यानंतर याबाबत त्यांनी अधिक शोध सुरू झाला होता, अशे एफडीआयचे प्रमुख एच.जी. कोशिया यांनी सांगितले.
अधिक तपासामध्ये एका मेडिकल स्टोअरचे मालक असलेल्या आशिष शाह यांनी बिल न घेता १ लाख ३५ हजार रुपयांची इंजेक्शन घेतल्याचे समोर आले. ही इंजेक्शन सूरतमधील सोहेल इस्माइल याच्याकडून खरेदी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. अशा प्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याच्या या काळ्या धंद्याचा भांडाफोड झाल्यानंतर सोलेह इस्माइल, नीलेश लालीवाला, अक्षय शाह, हर्ष ठाकोर आणि आशिष शाह अशा पाच जणांना अटक करण्यात आली.