नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत ६६,५५० रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने भारतात आजवर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २४.०४ लाखांवर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या २५ दिवसांत रुग्ण बरे होण्याच्या दरात तब्बल शंभर टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, मृत्युदरातही घट होत आहे. भारतात मृत्युदर जगात सर्वांत कमी १.८४ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचा दर ७५.९२ टक्के आहे.
कोरोनामुक्त लोक आणि उपचार चालू असलेले एकूण रुग्ण यातील १७ लाखांहून अधिकची तफावत हे चाचण्या व योग्य उपचाराच्या सरकारी धोरणाचे यश होय. उपचार घेणाऱ्यांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३.४१ पट अधिक आहे.लस मिळवण्यासाठी रशियासोबत चर्चा सुरूरशिया । कोविड १९ वर रशियाने सर्वात आधी तयार केलेली लस मिळवण्यासाठी भारताने त्या देशाशी चर्चा सुरू केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी ही माहिती दिली. रशिया व भारत मिळून या लसीचे उत्पादन तयार करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे रशियानेही म्हटले आहे. स्पुटनिक ५ कोविड १९ असे या लसीचे नाव आहे.
चीन । चीननेही कोरोनावरील लस तयार केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना ती २२ आॅगस्टपासून देण्यास सुरुवात केली आहे. चीननेच मंगळवारी ही माहिती दिली.भारत । भारतात सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोवीशिल्ड ही लस मंगळवारी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात देण्यास सुरुवात झाली. ही या लसीची दुसरी चाचणी आहे.