नवी दिल्ली : देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याच्या घटनेला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या साथीचा तसेच कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांचा देशाने मुकाबला केला. इतके सारे होऊनही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोरोनाची साथ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत.चीनमधील वुहान विद्यापीठात वैद्यकीय शाखेत शिकणारी भारतीय युवती केरळमध्ये आली होती. ती देशातील पहिली कोरोना रुग्ण ठरली. त्यानंतरच्या काळात भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. लस तसेच ऑक्सिजनचा तुटवडा खूप जाणवला होता. डेल्टानंतर ओमायक्रॉनच्या विषाणूमुळे तिसरी लाट आली. ओमायक्रॉन पूर्वीच्या विषाणूंपेक्षा तुलनेने कमी घातक असल्याचा काही जणांकडून दावा करण्यात येतो. या नव्या विषाणूमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. २ जानेवारीपासून कोरोनाच्या दीड लाख नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यातील ७१,४२८ जणांमध्ये कोरोना विषाणूचे अस्तित्व आढळले होते. त्यापैकी ६७,७०० नागरिक देशातील, तर ३,७२८ जण विदेशातील होते. ७१,४२८ जणांपैकी ४१,२२० जणांना डेल्टा विषाणूचा संसर्ग झाला होता व उर्वरित रुग्ण कोरोनाच्या अन्य प्रकारच्या विषाणूंनी बाधित होते.
Coronavirus : देशात कोरोना साथ संपण्याची दिसेनात चिन्हे, समोर येतेय अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 6:04 AM