जिनिवा: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस करण्यात आलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्याच्या दृष्टीनं मोदी सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सरकारनं मिशन अनलॉकची घोषणादेखील केली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकार लॉकडाऊन हटवण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. मात्र तसं केल्यास भारतामधील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकेल, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेतील एका प्रमुख तज्ज्ञानं दिला आहे.भारतामधील कोरोनाची स्थिती सध्या स्फोटक नाही. मात्र मार्चमध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हटवण्याच्या दृष्टीनं भारताची वाटचाल सुरू असल्यानं जोखीम वाढली आहे, असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपत्कालीन स्थिती कार्यक्रमाचे संचालक मिशेल रियान यांनी व्यक्त केलं. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावघी जवळपास तीन आठवडे इतका असल्याचं रियान यांनी म्हटलं.कोरोना विषाणूचा परिणाम भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या देशभरात कमी-अधिक आहे. ग्रामीण, शहरी भागांची तुलना केल्यास मोठा फरक आहे. भारतासोबतच लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या दक्षिण आशियातील बांग्लादेश आणि पाकिस्तानमधील कोरोना रुग्णांची संख्या सध्या तरी नियंत्रणात आहे. मात्र ती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका कायम आहे, असं निरीक्षण रियान यांनी नोंदवलं.कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणा वाढू शकते. आतापर्यंत अनेक भागांमध्ये असं घडल्याचं पाहण्यात आलं आहे, असं रियान म्हणाले. भारतात देशव्यापी लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग आटोक्यात असल्याचं पाहायला मिळालं. मात्र देशातील दैनंदिन व्यवहार सुरू झाल्यास रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे, असा इशारा त्यांनी दिला.
CoronaVirus News: ...तर भारतात 'कोरोना बॉम्ब' फुटेल; जागतिक आरोग्य संघटनेचा अतिगंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 5:45 PM