कटक - तबलिगी जमातशी संबंधित पुण्यातील विविध मशिदीमध्ये राहणार्या ८ टान्झानियाच्या नागरिकांवर कोरोना संबंधीत साथीच्या रोगाचा कायद्याचा भंग केला तसेच परकीय नागरिक कायद्याचा भंग केल्याखाली गुन्हा दाखल केला होता. तसेच टुरिस्ट व्हिसावर येऊन धार्मिक प्रचार करत करुन त्यांनी व्हिसा कायद्याचा भंग केल्याचेही सांगण्यात आले. तर इंदुरमध्येही वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन काहींना अटकही करण्यात आली आहे. आता, ओडिशातही पोलिसांनी कारवाई करत, २५ मुस्लीम नागरिकांना अटक केली आहे.
ओडिशातील कटक येथे पोलिसांनी २५ मुस्लिमांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. ओडिशातील ४८ तासांच्या संचारबंदी काळात पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे या सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच काळात ओडिशात ४८ तासांची म्हणजे २ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, या काळात तेथील मुस्लिमांनी पोलिसांवर दगडफेक केली.
कटकचे पोलीस आयुक्त अखिलेश्वर सिंग यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, मंगलाबाग येथील पोलीस निरीक्षक आणि काही पोलीस हे केशरपूर परिसरात पेट्रोलिंगच्या कर्तव्यावर होते. त्यावेळी, तेथील स्थानिक मस्जीदजवळ काही लोकं बसल्याचे त्यांना पाहायला मिळाले. म्हणून, तेथील तरुणांना तुम्ही घर सोडून इथं का बसले? असा प्रश्न पोलिसांनी केला. तेव्हा, या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्ये पोलीस निरीक्षकांसह इतर पोलिस जखमी झाले. या घटनेनंतर संबंधित परिसरात पोलिसांनी दोन अधिकची पथके तैनात केली. या घटनेचे पडसाद उमटू नये, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन कार्यवाही केल्याचं सिंग यांनी म्हटले.
दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आयपीसीच्या कलमान्यवये पोलिसांवर दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ओडिशा पोलिसांनी २७०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले असून लॉकडाऊनचं उल्लंघन केलेल्या २६०० नागरिकांना रविवारी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच, ४०० पेक्षा जास्त दुचाकी गाड्या जप्त केल्याचेही सिंग यांनी सांगितले.