नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या काही दिवसांत संपूर्ण देशात वेगात झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र असे असले तरी सुमारे नऊ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मात्र कोरोनाचे फारसे रुग्ण आढळून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकार कोरोनाच्या संशयित रुग्णांचे कमी नमुने तपासणीसाठी येत असल्याने राज्यात कोरोनाबाधितांची संख्या फार कमी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पश्चिम बंगाल सरकारने कोरोनाच्या संशयित रुग्णांचे केवळ 2523 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी 95 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. नॅशनल इंस्टिट्युट अॉफ कॉलरा अँड एंटरिक डिसीसच्या पश्चिम विभागाचे संचालक डॉ. शांता दत्ता यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भातील वृत्त आज तकने प्रसारित केले आहे. पश्चिम बंगालने आतापर्यंत 2523 जणांचेच नमुने तपासले आहेत. देशातील इतर राज्यांशी तुलना करता हा आकडा फार कमी आहे. 'ही आकडेवारी फार कमी आहे. गेल्या आठवड्यात तर दर दिवशी सरासरी 20 नमुनेसुद्धा तपासणीसाठी आले नव्हते. तपासणीसाठी किती जणांचे नमुने पाठवावेत राज्य सरकारवर अवलंबून आहे. जास्त नमुने पाठवले गेल्यास आम्ही जास्त तपासणी करू शकतो,' असे दत्ता म्हणाले.
'राज्यात सुरुवातीला कोरोना चाचणी करणारे केवळ आमचेच केंद्र होते. त्यावेळी आम्ही दिवसाला 90 ते 100 नमुन्यांची तपासणी करायचो. मात्र नंतर चाचणी केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आमच्याकडे कमी नमुने येत असावेत, असेही दत्ता यांनी सांगितले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या चाचणी किट्स कमी पाठवण्यात आल्या, असा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेला आरोप डॉ. दत्ता यांनी फेटाळून लावला आहे. आयसीएमआरने आतापर्यंत 42 हजार 500 टेस्टिंग किट्स पाठवल्या आहेत. आमच्याकडे टेस्टिंग किट्सची टंचाई नाही. आम्ही बंगालसोबतच ओदिशा आणि पोर्ट ब्लेअरसाठीही टेस्टिंग किट्स पाठवल्या आहेत. तरीही आमच्याकडे 27 हजार किट्स शिल्लक आहे.